Showing posts with label Sandeep Khare. Show all posts
Showing posts with label Sandeep Khare. Show all posts

Tuesday, March 18, 2008

असे वाटते आज-काल...

संदीपची नवीन कविता - असे वाटते आज-काल...

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये॥
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ धृ ॥

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार॥
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ १ ॥

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे॥
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ २ ॥

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार॥
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ३ ॥

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव॥
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ४ ॥

आधी उत्सुक्‍तांचा जीव, त्याला बांधून घ्यावी शीव॥
घर दार उबवत रहावे फक्‍त, डबके सोडून हिंडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ५ ॥

स्वतःलाच घालत धाक, कुरकूर रेटत ठवलं चाक॥
खेचत ठेवले अजून गाडे, आता फार ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ६ ॥

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ॥
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

--- संदीप खरे

Thursday, March 13, 2008

हृदय फेकले तुझ्या दिशेने

संदीपची नवीन कविता - हृदय फेकले तुझ्या दिशेने
साधारणपणे ऑक्टोबर २००७ मध्ये संदीपनी लंडनमध्ये लिहिलेली ही कविता आहे :-
हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌

हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌

गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर

मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही
--- संदीप खरे.