"वनवास" हे नाव वाचल्यावर मला वाटले की हे पुस्तक थोडे गंभीर स्वरुपाचे असेल... मी बस मध्येच ते वाचायला घेतले आणि माझे मलाच आठवत नाही की पुस्तक वाचतानां मी कितीदा मोठया मोठयाने हसलो आणि ... खरे सांगायचे तर ... काही वेळा रडलो देखील...
काही कथासंग्रह विनोदी असतात तर काही गंभीर; हा मला माझा वाटला! प्रकाश नारायण संतानीं, वनवास चे लेखक, कुठलाही आव न आणता लम्पन ची कथा त्याच्याच शब्दांत कागदावर उतरवलीय. एका शाळकरी मुलाचे सुन्दर जग... त्याचे आयुष्य, ते वातावरण; वाचता-वाचता आपणही लम्पन बरोबर त्याच्या गावात पोहचतो, मग सुमीमध्ये आपल्याला आपल्या बालपणाची हरवलेली मैत्रिण सापडते, गुन्डीमठ रस्ता आपल्या गावातल्या गल्ली सारखा वाटतो आणि आईची खुप खुप आठवण येते...मन दूर भुतकाळात जुन्या दिवसांच्या गावी जाते, तुम्हाला आठवतात शाळेतल्या गमती, तुमच्या शेजारी बसणारे मित्र...तुमच्यावर रागावणारे तुमचे आज्जी आजोबा, आईच्या हातचा मार, तुम्ही लटके रागावुन घरातून रुसून गावातील मंदिरात गेले होते तो प्रसंग, मग आईने तुमची काढलेली समजूत, त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, सुरपारम्ब्या... आणि बरेच काही! आणि यामुळेच तुम्हाला हा कथासंग्रह तुमचा वाटतो।
हा लम्पन त्याच्या आज्जी आजोबांकडे राहतो. तो तिथेच शाळेत जातो. कर्नाटकातील कुठलेशे हे सुंदर गाव तिथे एक तळे आहे, मारुतीचे मन्दिर आहे, गावाबाहेर छान छान शेतं आहेत... लम्पन चे आजोबा अणि लम्पन ची खास मैत्री आहे ते त्याच्यावर फारसे रागावत वगैरे नाहीत... आज्जी मात्र थोsssडी म्याड आहे कारण ती कधी रागावते अणि कधी माया करते. सूमीचे आजोबा मात्र खुप खाष्ट आहेत, कारण भूगोल त्यांचा आवडता विषय आहे आणि लम्पनने एकोनिसशे सत्ताविस वेळा वाचुनही तो त्याच्या लक्षात राहत नाही. लम्पंची आई-बाबा त्याची म्याड बहिण मनी आणि बिट्ट्या त्याला कधी कधी भेटायला येतात... ते दिवस मात्र तो जपून ठेवतो।
ह्या लम्पनच्या गोष्टी "एकदा नाही दोनदा नाही अठावीसशे तीस वेळा जरी म्याड सारख्या वाचाल्या" तरी ताज्याच वाटतील. सुमीला बघितल्यावर त्याचे पाण्यात खोल गेल्यासारखे वाटने, तिने काही विचारल्यावर, आजी काचेचे भांडे जेंव्हा जपून घेउन जायला सांगते तेंव्हा सारखी पोटात गडबड होणे. सगळेच अप्रतिम आहे. त्याच्या पौगंडावस्थेतील भावविश्वाचे इतके छान चित्रण करण्यासाठी मनही तेवढेच लहान मुलाचे असावे लागते. वनवास वाचल्यावर वनवास हाही खर्या अर्थाने आनंदवासच असतो हे प्रकाश नारायण संतांचे मत तुम्हालाही पटते. हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल.
( वनवास लेखक: प्रकाश नारायण संत प्रकाशन: मौज )
-nile
No comments:
Post a Comment